दुर्बलता खाकी वर्दीची

लहानपणी जरा खोडसाळपणा केला कि मोठी माणसे लगेच दामटवायची ,”पोलीस काकांना बोलवेन हं | आले कि मग मारतील ते तुला.” बालपणी तर पोलीस काका हे काका कमी आणि राक्षस जास्त वाटायचे. पण नंतर जरा जरा वय वाढतच कळू लागल कि पोलीस हे क्रूर राक्षस नसून समाजातील राक्षसी प्रवृत्तीचा नाश करणारे ते आपले रक्षक मित्रच आहेत.  

https://www.vijetaacademy.com/vijetaservice/psi-home.jpg

                            जसं जसं आपण शालेय जीवनात पाउल टाकतो तसं आपल्याला ह्या खाकी वर्दीतला माणूस समजायला लागतो.मनामध्ये ह्या वर्दिविषयी अभिमान निर्माण होते. आणि मग त्यावयात पोलीस बनण्याची प्रचंड अभिलाषा जागृत होते.

                           “सद्रक्षणाय खालनिग्रहणाय” असणार्या पोलीसांबाबतीतल्या अनेक चित्रविचित्र वार्ता आपल्या कानी पडतात किंवा वर्तमानपत्रातून डोकावतात. ‘पोलीस अधिकारीच घेतात लाच’ , ‘पोलीसांकडून निर्दयी मारहाण’ , ‘खाकी वर्दीला लागला काळीमा’ अशा मथळ्याच्या बातम्या वाचल्या कि सर्वसामान्यांचे रक्षकच भक्षक का बनतात असा सवाल मनात येतो. पण शेवटी दिसतं तसं नसतं अस म्हणतात ते काही उगीच नाही.अशा बातम्यांमागे पुष्कळदा दडलेले असते वेगळेच वास्तव , अंधारात ठेवलेले |.    

                             दिसताना उच्च व दर्जेदार दिसणारी हि वर्दी सत्यात मात्र अतिशय दीन आणि दयनीय आहे.पोलीस यंत्रणा हि सरकारी यंत्रणा असल्यामुळे त्यात भ्रष्टाचार , दबाव अशा बाबी मिसळतात आणि ह्या यंत्रणेचे बाहुलेच बनवतात. पोलिसांचे काम हे कायद्याच रक्षण कारण हे असते , परंतु हाच कायदा बंधन बनून पोलिसांना खोल गर्तेत फेकतो. समोर एखादा गुन्हेगार दिसत असूनसुद्धा त्याच्यावर action मात्र घेता येत नाही. उभा असलेला गुन्हेगार गुर्मीतच राहतो पण पोलीस मात्र गुन्हा दाखल करून घेणे , चौकशी करणे , पुरावे गोळा करत बसणे आणि शेवटी त्याला गुन्हेगार सिद्ध करणे अशात आपले सामर्थ्य वाया घालवते. बर||| एवढ सगळं होऊन सुद्धा मग गुन्हेगाराला वाचवण्यासाठी राजकीय व्यक्तीचा दबाव पडतो आणि मग “फाईल बंद ”. समाजात गुन्हे घडत राहतात मात्र बायका मुलांच्या जीवाच्या भीतीने हातावर हात ठेवून बघत बसावं लागतं फक्त.

                     कायद्याच्या पळवाटांतून खुनी सुटतात पण पोलीस मात्र अडकतो. कंबरेवरच पिस्तूल असूनसुद्धा कायदा आडवा आल्यामुळे ते पिस्तूल एखाद्या अलंकाराप्रमाणे कंबरेवरच ठेवाव लागत . सध्याच हैद्राबाद मध्ये आपण पाहिलं कि पोलिसांनी धाडस करून बालात्कार्यांना गोळ्या  झाडल्याच, पण ‘फेक एन्काउंटर’ असे बरळून अनेक समाजकंठकांनी पोलिसांनाच गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं केलं. गुन्हेगार गुन्हा करून मोकळा होतो , पण बंधनं येतात ती अहोरात्र झटणाऱ्या अधिकार्यांवरच. गुन्हेगारावर एक हात उगारायचा म्हटलं तरी १०० कायदे तपासून परवानगी आहे का हे आधी त्यांना बघव लागतं. त्यात घरच्यांना जीवे मारण्याची धमकी , बदलीची धमकी , राजकीय दबाव हे तर वेगळच.

                     पोलीस यंत्रणेचा दुबळेपणा उघड्यावर पडल्यामुळे जनताही आता कुणाला भीत नाही. काही दिवसांपूर्वी दिल्ली मध्ये तर विद्यार्थीच पोलिसांवर तुटून पडले. नाईलाजाने शेवटी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागलेला, मात्र “रक्षकच बनले भक्षक” अशा खोट्या बातम्या सोशल मीडियाद्वारे पसरवल्या गेल्या.

                       देशभर करोनाच्या पार्श्वभूमीमुळे  सध्या lock down आहे. अत्यावश्यक गरजेपुरतं बाहेर पडण्यास फक्त परवानगी आहे. या जमाव बंदीमुळे पोलीस चौकाचौकात त्यांचे काम चोख बजावताना दिसतात. पण पोलीस मात्र काहीच करू शकत नाहीत हे माहित असल्यामुळे सर्रास सर्वजण कायद्या उल्लंघन करत आहेत हे आपण पाहतो. जरी पोलिसांनी पकडलच तर खोट्या सबबी सांगून ताठ मानेने पळ काढता येतो. हि फसवणूक लक्षात येऊन सुद्धा कायद्याच्या कचाट्यात सापडल्यामुळे पोलिसांना काही करता येत नाही.

                       आज जी पोलीस व्यवस्था सगळ्यात सबळ , मजबूत असायला हवी होती , तीच व्यवस्था दुबळी झालेली दिसते. रात्रंदिवस करायला लागणारी ड्युटी , सणावराला पण करायला लागणारे काम ह्या त्यांच्या आपत्ती तर सर्वांना माहितच आहेत.

                      देशात वाढत्या गुन्ह्यांवर लगाम लावण्यासाठी पोलीस यंत्रणेकडे लक्ष्य देणे अनिवार्य आहे. आज जे पोलीस स्वतःच्या जीवाची परवा न करता डोळ्यात तेल घालून समाजाचे संरक्षण करत आहेत त्यांना जरा स्वातंत्र्य देऊन भरभराट करणं साध्याच्या घडीला आवश्यक आहे. राष्ट्राच्या उन्नतीचे हृदय असणारे रक्षकच भक्ष्य बनत नाहीत ना ? इकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे

-दैदीप्य जोशी

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *