CORONA Covid-19 in India| कोरोना आणि वस्तुस्थिती

सारं जग कोरोनाविरोधातील लढाई लढत आहे. येऊ घाललेल्या संकटाला तितक्याच निधडाने सामोरे जाण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. या महाभयंकर रोगाला थोपविण्यासाठी विषेश वैद्यकीय कक्ष निर्माण केले जात आहे, नवीन दवाखाने बांधले जात आहेत, विलगीकरण कक्षात स्वतंत्र व्यवस्था केली जात आहे. जगभरात लस शोधण्याचे अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. करोनाच्या राक्षसाशी शास्रीय लढाई सुरू आहे. काही प्रमाणात थोपविण्यात यश येत आहे, परंतु त्याच्या व्यप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यादृष्टीने हात वारंवार स्वच्छ करण्याबरोबरच एकत्र थांबू नये, यासाठी प्रशासन सुचना करत आहे. देशातील केंद्र सरकारपेक्षा विविध राज्य सरकारांनी तत्परतेने उपाययोजना करण्यावर भर दिला आणि देत आहेत. परंतु देशात गोमूत्र पिल्यानंतर आणि शेण खाद्यानंतर कोरोनापासून संरक्षण होईल, अशा माथळ्याखाली बातम्या प्रसिद्ध होत होत्या. मिडियाने पण त्याला भरभरून प्रसिद्ध दिली. जय महाराष्ट्र चँनेलने तर कहरच केला. एका ज्योतिषी ला बोलवून कोरोनोवरती लक्षवेधी कार्यक्रम घेतला. एकीकडे मुळ समस्या गंभीर बनत चालली असताना शेण आणि गोमूत्र हेच रामबाण उपाय आहे, हे व्हाट्सएप युनिव्हर्सिटी पध्दतशीरपणे पसरवत होती.


रविवारी २२ मार्च रोजी पंतप्रधानांनी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याची हाक दिली होती. शनिवारपासून बंदाची तयारी चालू होती. माणसांनी एकमेकांसोबत संपर्क तोडण्याची गरज आहे. त्या दृष्टीने बंद महत्त्वाचा होता, परंतु बंद त्याअधी जर कठोर उपाययोजना करण्याची गरज होती. ‘जनता कर्फ्यू’ ला जनतेचे स्वइच्छेने प्रतिसाद दिला. परंतु सायंकाळी ५ नंतर पंतप्रधानांनी दिलेल्या आवहानानुसार डाॅक्टर्स, नर्सेस, फार्मासिस्ट्स, वाॅर्डबाॅइज्, सफाई कामगार यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचे आवहान केले होते. १३६ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचा पंतप्रधान एखादा निर्णय घेतो, त्याला निश्चितच महत्व असणार आहे. परंतु पंतप्रधानांनी देशातील जनतेला काय करावे याबाबत सुचना दिल्या असत्या तर उचित झाले असते. नागरिकांना थाळ्या, टाळ्या वाजविण्यास सांगितले परंतु ते एकत्र येऊन वाजवू नये, घरात बसून वाजवावे असे सांगितले नाही. तसेच किती वेळ वाजवावे हे पण सांगितले नाही. लोकांनी गल्लोगल्ली, मोहल्या-मोहल्यात घोळके करून टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. पोलिसांनी सुध्दा त्याला दाद दिली.काही ठिकाणी तर ताट, मगळेल ते भांडे घेऊन माणसे वाजवत होती. ताशा, घंटी, शंखनाद सुरू होतो. शिकलेली सवरलेली तरूण मुलं-मुली उत्सव असल्यासारखे ओरडत टाळ्या वाजवत होती. गर्दी टाळण्याचे आवहान विसरले होते. काही ठिकाणी तर टाळ्या, थाळ्या वाजवत मोर्चे निघाले. फटाके फोटून जल्लोष झाला, ढोल वाजवले गेले. फक्त शिक्षण घेतलेली अशिक्षित माणसं अंधश्रद्धेच्या खाईत लोटली जात आहेत. जग विज्ञानाच्या दिशेने वाटचाल करत असताना भारतीय समाज बौध्दिक गुलामगिरीत जगत आहे. विचाराच्या कक्षा सिमित झालेल्या माणसांचा प्रत्यय यानिमित्ताने पहावयास मिळाला. ‘जनता कर्फ्यू’ बाबत एम्समधील मायक्रोबायोलॉजीच्या माजी प्रमुख डॉक्टर शोभा यांनी सांगितल्यानुसार “फक्त एक दिवस लोकांमध्ये अजिबात संपर्क न आल्यामुळे विषाणू नष्ट होतो असं म्हणणं चुकीचं आहे. यामुळे विषाणूंचा फैलाव कमी करण्यात नक्की मदत होईल. पण यामुळे साखळी अजिबात तुटणार नाही. विषाणू २० ते २२ तासात नष्ट होतात असा कोणताही पुरावा नाही.”


देशभरातील पहिला रूग्ण ज्या केरळमध्ये सापडला, त्या केरळच्या सरकारने तत्परतेने उपाययोजना सुरू केल्या. ‘ब्रेक द चेन’ मोहीम राबवत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवहान केले. मास्कचा तुटवडा होऊ नये म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न केले. केरळच्या सरकारने दोन पाऊले पुढे टाकत जनतेसाठी विशेष २०,००० कोटी रूपयाचे पँकेज जाहीर केले आहे. त्यामध्ये एपीएल आणि बीपीएल रेशनकार्ड धारकांना मोफत अन्नधान्य, १ हजार ३५० कोटी रूपयांची सामाजिक कल्याणकारी योजनांसाठी तरतूद, राज्यात १००० ठिकाणी २० रूपयांत भोजन देणारी केंद्र, रोजगार हमी योजनेसाठी २००० कोटी रूपयांची तरतूद, आरोग्य सेवेसाठी ५०० कोटी रूपयांची तरतूद, विज व पाणी बील भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ, चित्रपटगृहांची करमणुक कर माफ आदींचा समावेश आहे. डीवायएफआय या युवक संघटनेने हजारो मास्क आणि सँनिटायझर बनवून वितरीत केले. केरळमधील अनेक सामाजिक संघटना, संस्था यांनी पुढाकार घेत सार्वजनिक ठिकाणीची स्वच्छतेची मोहिम हाती घेतली आहे. कोची येथील कोचीन सर्जिकलचे मालक तसलीम पीके यांनी २ रूपये प्रती नग दराने मास्क विकले. त्यांंनी सांगितले की, त्यांनी रूग्णालयातील कर्मचारी, केएसईबी कर्मचारी आणि उच्च न्यायालयातील कर्मचार्‍यांसह उच्च जोखमीच्या गटातील सुमारे साडेचार हजार फेस मास्क वितरित केले आहेत. आम्ही मागील महिन्यापर्यंत मास्क प्रती तुकडा २ रुपये द्यायचे. तथापि, आता किंमतीत वाढ झाली आहे आणि मी अलीकडे प्रति नग ८ रुपयांना नवीन माल खरेदी केले. उद्रेकातून उद्भवलेल्या आरोग्यास होणार्‍या धोक्याचा विचार करता, मी मुखवटा उच्च जोखमीच्या गटांना मूळ दरावर वितरीत करीत आहे,” असे तो म्हणाला.


देशाच्या पंतप्रधानांनी यापासून धडा घेत देशात आरोग्यावरील खर्चासाठी विषेश तरतूद करण्याची गरज आहे. ते ‘मन की बात’ करत बसले. केद्र सरकारने आरोग्य क्षेत्रावर २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात ६९ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परंतु जीडीपीशी त्याचे प्रमाण १.५ टक्के आहे. आरोग्याच्या सोयीसुविधांबाबत भारतीय आरोग्य विभाग जगात १०२ आहे. देशातील १३५ कोटी लोकसंख्येचा सरकारच्या म्हणण्यानुसार भारतात दर १,४५७ नागरिकांसाठी एक डॉक्टर आहे. जो जागतिक आरोग्य संघटनेच्या १:१००० निकषापेक्षा कमी आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार ३० जून २०१६ पर्यंत राज्य वैद्यकीय परिषद व एमसीआयकडे एकूण ९,८८,९२२ अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांची नोंद झाली आहे. “८० टक्के उपलब्धता गृहीत धरून अंदाजे ७.९१ लाख डॉक्टर सक्रिय सेवेसाठी प्रत्यक्षात उपलब्ध असू शकतात. देशातील आरोग्य व्यवस्थेची ऐशीतैशी झालेली असून केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याला आर्थिक मदत होणे गरजेचे आहे. आरोग्य खात्याला अपुऱ्या मनुष्यबळावर लढाई करावी लागत आहे. पुण्यामध्ये रूग्णांंची संख्या वाढतच आहे, पुणे मनपातील आरोग्य विभागातील ४४ टक्के जागा रिक्त आहेत. एकूण मंजूर १६६९ पदांपैकी ७३३ जागा रिक्त आहेत. असेच चित्र इतरही ठिकाणी आहे. सेवा देणाऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आहे. परंतु त्यांच्यावरील ताणही कमी करण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने एक पाठोपाठ एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. देशात सर्वात जास्त रूग्ण महाराष्ट्रात आहे. संख्येमध्ये वाढ होत असून महाराष्ट्रातील सर्व शाळा, संस्था, सार्वजनिक बंद, जिल्ह्यांंतर्गत वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहे. कलम १४४ लागू करण्यात आले असून गर्दी टाळण्याचे आवहान करण्यात येत आहे. पुणे, मुंबई अतिदक्षता घेण्याची गरज आहे. मुंबईतील लोकल रेल्वे बंद करण्यात आलेली असून नागरिकांनी आवश्यक असताना बाहेर पडण्याची गरज आहे. परंतु शासनाने नागरिकांच्या आणि सेवा देणाऱ्या डाॅक्टर्स, नर्सेस, फार्मासिस्ट्स, वाॅर्डबाॅइज्, सफाई कामगार, आशा वर्कर्स यांचा पण विचार करण्याची गरज आहे, टाळ्या आणि थाळ्या वाजवून प्रश्न सुटणार नाही. बेसिक आरोग्य सुविधांसाठी तातडीने निधी जाहीर करावा, शेतकरी, कामगार, शेतमजूर, असंघटित क्षेत्रातील कामगार, व्यापारी आणि व्यावसायिक यांचे होणारे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी सरकारने उपायोजना कराव्यात, सर्व एपीएल आणि बीपीएल रेशनकार्ड धारकांना अन्नधान्य मोफत वितरित करावे, देशभरात हजारो नर्सेस तुटपुंज्या पगारावर कॉन्ट्रॅक्टवर काम करतात, त्यांना कायम करावे, चतुर्थ श्रेणीच्या असंघटीत स्वच्छता कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, मेडिकल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करा, कोरोना टेस्ट किट्स औषध दुकानावरून अल्प किमतीत उपलब्ध करून देणे, जेणेकरून जास्ती जास्त लोकांचे सहजगत्या निदान होऊ शकेल; आणि व्हायरस बाधित लोकांचे वेळीच विलगीकरण करता येईल, जागोजागी सॅनिटायझरची व मास्कची व्यवस्था अल्पदरात करणे आदी गोष्टींंचा विचार शासनाने केला पाहिजे. ‘मन की बात’ करणाऱ्या पंतप्रधानांना कळविले पाहिजे. भारतात covid-19 टेस्ट साठी किट्स बनविण्यासाठी अनेक औषधी कंपन्या गेल्या महिनाभरापासून केंद्र सरकारच्या मान्यतेची वाट बघत होत्या, परंतु परवानगी दिली गेली नाही. कोरोना टेस्टिंग किट्स (आरआरटी-पीसीआर मशीन) चे कंत्राट ‘”कोसारा डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड” या अडाणीच्या कंपनीला दिलेले असून केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) त्याला परवानगी दिली आहे. एकापेक्षा जास्त कंपन्यांना उत्पादनाची परवानगी दिली असती तर स्पर्धा होऊन किंमत निश्चित कमी असती. नागरिकांना याचा फायदा झाला असता, परंतु मर्जीतील मित्रांना फायदा मिळवून देण्याचा हा खटाटोप होता.


हातावर पोट असणाऱ्या लोकांना जिवावर उदार होऊन कामासाठी घराबाहेर पडावेच लागत आहे. शेतकरी, शेतमजूर यांनी काम केले नाही, तर त्यांचे घर कसे चालणार? देशातील असंघटित क्षेत्रातील लोकांचं कसं होणार. एक दिवस कामाला नाही गेलं तर उपासमारीची वेळ येईल त्यांनी काय करायचं. देशातील आरोग्य सेवा कशी आहे हे सांगायला नको. जर पोटात अन्न नसेल कोरोनापेक्षा भुकमरीने लोकं मरतील. त्यासाठी पर्यायी व्यवस्था तातडीने निर्माण करावी लागेल. ‘जनता कर्फ्यू’ फक्त प्रतिकात्मक झाला. परंतु नागरिकांच्या गरज लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. संशोधक, वैज्ञानिक करोनाबाबत काय म्हणतात याबद्दल वैज्ञानिक माहिती देऊन लोकांना सजग करावे लागेल. अफवांंवर विश्वास ठेऊ नका. व्हाट्सएप युनिव्हर्सिटीमधून येणारे मेसेज तसेच फॉरवर्ड न करता त्याची शहानिशा करूनच पाठवावेत. जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही.


पोलीस, डॉक्टर, पालिकेचे कर्मचारी,शेतकऱ्यांचे, पत्रकार अगदी आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री यांचे खरंच आभार मानायला हवेत. ते आपले कर्तव्य आहे, पण असं एकत्रितपणे गोंधळ घालून नका!

-By नवनाथ मोरे

Reference

  • https://www.newindianexpress.com/states/kerala/2020/mar/12/man-sells-masks-at-rs-2-per-piece-2115508.html
  • https://worldpopulationreview.com/countries/best-healthcare-in-the-world/
  • https://mybs.in/2X7VpPR India has one doctor for every 1,457 citizens: Govt
  • दै. सकाळ – २२ मार्च २०२० (पुणे आवृत्ती)
  • https://ahmedabadmirror.indiatimes.com/ahmedabad/cover-story/ahmedabad-firm-first-in-india-to-get-licence-to-make-covid-19-testing-kits/articleshow/74699960.cms
  • https://m.timesofindia.com/india/companies-wait-weeks-for-coronavirus-test-validation/amp_articleshow/74701811.cms
  • https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-experts-claims-janata-curfew-wont-break-chain-of-transmission-sgy-87-2113157/?fbclid=IwAR1_DrvN8LxuHLCMk6qID2r-HZtUGxH29xppKSSFpA1KY6LgPNt8rOf5LME
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *