‘लाल’ भ्रमाचा, ‘बंगाली’ भोपळा !

सुमारे चौतीस वर्षांची लोकशाही मार्गाने येत गेलेली, एकछत्री आणि पोलादी साम्यवादी राजवट, राजवटी आधी राहिलेला वैचारिक आणि पतनानंतर राहिलेला गतसत्ता संबंधीय प्रभाव, या अर्थाने साठएक वर्ष डाव्यांचा गड राहीलेले पश्चिम बंगाल!

जन-आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या देशव्यापी ‘संविधान सन्मान यात्रे’ च्या तिसऱ्या टप्प्यात १६  ते १८ नोव्हेंबर दरम्यान पश्चिम बंगाल राज्यात जाता आले. एका मर्यादेत, तेथील जन-आंदोलनांचे संघर्ष पाहता आले. तेथील सामाजिक, राजकीय जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करता आला. स्थानिक कार्यकर्त्यांसह नागरिकांशी संवाद साधता आला. या सर्व पार्श्वभूमीवर झालेले आकलन आणि चिंतन या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

 “डाव्या विचारांचे तारुण्यसुलभ आकर्षण, दीर्घ काळ डाव्या विचारांची सत्ता असलेल्या प्रांताच्या भेटीची उत्सुकता, साम्यवादाबद्दल असलेली सहानुभूती, या सर्वांमुळे बंगाल विषयी माझ्या पूर्वग्रहांची प्रभावळ नारंगी झाली असली तरी, डोळ्यांवर मात्र लाल-झापडं निश्चितच नव्हती!” असं मला वाटत असलं तरी, हेच खरं होतं काय ? नेणिवेच्या त्या अथांग डोहातील कुठल्याशा कोपऱ्यात नकळतपणे, एखादा ‘लाल’ भ्रम जोपासला जात नव्हता काय ?

१६ नोव्हेंबरच्या पहाटे संविधान सन्मान यात्रेचा जथ्था कलकत्यास पोहचता झाला. एक गट कलकत्यातील विविध नागरी प्रश्नांशी संबंधित कार्यक्रम व सायंकाळी मेधाताईंच्या उपस्थितीत होणाऱ्या पत्र परिषदेसाठी कलकत्यामध्येच थांबला. उरलेल्या लोकांसह आमची बस सुंदरबनकडे निघाली. तेथे वनकर्मचारी आणि मासेमारीशी संबंधित लोकांनी सभा आयोजित केली होती. ‘बंगाल टायगर’ साठी प्रसिद्ध असलेल्या या सुंदरबन qपरिसरात फिरताना, मानव आणि वन्य प्राणी संघर्षाच्या अनेक कहाण्या ऐकायला मिळाल्या. हा संघर्ष येथील लोकांसाठी जणू रोजचाच झालाय! मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये गंगा नदीवर सत्तरच्या दशकात फराक्का धरण बांधले गेले आहे. या धरणाचे भौगोलिक स्थान बांगलादेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंड यांच्या सीमांच्या अगदी जवळ आहे. कलकत्ता बंदराचा प्राण असलेली हुगळी नदी बारा महिने भरलेली राहावी यासाठी हे धरण बांधले गेले आहे. कलकत्ता बंदरासाठी किती पाणी जाते वगैरे हा भाग निराळा असला तरी, रोज गंगेच्या विस्तारत जाणाऱ्या पत्राने गंभीर समस्या धारण केली आहे. या धरणामुळे गंगा, रोज अनेक एकर जमीन आपल्या पोटात घेताना शेकडो लोकांना ‘होत्याचे नव्हते’ करीत आहे. जमीनदारांच्या वेदना सरकारी, कार्पोरेट पांढरपेशी मनाला कदाचित अधिक हादरवून सोडतील अशी माझी वर्गसुलभ ‘कु’धारणा आहे! त्याला अनुसरून एक उदाहरण म्हणजे, आम्ही या धरण परिसरातील महेशपूर येथे सभेसाठी गेलो असता तेथील एका व्यक्तीने सांगितलेली आपबीती! आदल्या रात्री पन्नास एकर जमिनीचा मालक असलेली ती व्यक्ती सकाळी संपूर्ण पन्नास एकर जमीन पाण्याखाली गेल्याने रात्रीत उध्वस्त झाली ! येथील हजारो कुटुंबे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. बंगालच्या ‘माँ-माटी-मानुष’वाल्या दीदी, माटी सकट माँ-मानुषही पाण्याखाली गेले, तरीदेखील अजिबात ढळल्या नाहीत! येथील लोक गेली अनेक वर्षे नावातील ‘ममता’ कृतीत येण्याची वाट बघतायेत!

पुढे, ठीक-ठिकाणचे कार्यक्रम करीत आमचा जथ्था सिलिगुडीत येऊन पोहचला. सिलिगुडी आणि आसपासच्या दोन-तीन जिल्ह्यांचा परिसर हा उत्तर बंगाल म्हणून ओळखला जातो. ”या भागाला उर्वरित बंगालच्या तुलनेने कमी विकसित ठेवले आहे, उर्वरित बंगालचे राज्यकर्ते या भागाला नेहमीच सापत्न वागणूक देत आले आहेत”, असा येथील लोकांचा आक्षेप आहे. खरंतर, त्यावेळी मला विकसित कोणाला म्हणायचे आणि अविकसित कोणाला म्हणायचे हा प्रश्न पडला होता. कारण, सिलिगुडीत येऊ पर्यंत, माझ्या ‘लाल’ भ्रमाच्या ‘बंगाली’ भोपळ्याच्या पार चिंधड्या उडाल्या होत्या !

ज्येष्ठ कार्यकर्ते आणि विचारवंत प्रा. असित रॉय (असितदा), प.बंगाल एन. ए. पी. एम. चे समन्वयक अमितावदा तसेच बंगालचे बस मधील इतर साथी, सुंदरबनसह महेशपूर, सिलिगुडी येथील गावकरी यांच्याशी साम्यवादी राजवटी बद्दल अनेकदा चर्चा होत राहिल्या. मी संवाद साधलेल्यांपैकी जवळजवळ सर्वच लोक चौतीस वर्षांच्या ‘त्या’ राजवटी बद्दल कमालीचे नाराज दिसले. वयाची पंचाहत्तरी ओलंडलेले असितदा तर साम्यवादी राजवट येण्याच्याही खूप आधी पासून साम्यवादाचे सहानुभूतीदार होते. शिवाय चौतीस वर्षांची साम्यवादी राजवट, राजवटपूर्व आणि राजवटोत्तर असा बंगालचा ‘तिहेरी’ कालखंड त्यांनी अनुभवला आहे. मला याविषयावर त्यांच्याशी सखोल चर्चा करण्याची संधी, बसमध्ये यादृच्छिकपणे ते माझ्या शेजारी बसल्याने मिळाली. पुढे-पुढे तर, शेजारची सीट त्यांच्यासाठी मी राखून ठेऊ लागलो!

या चर्चांबरोबरच येणारे प्रत्यक्ष अनुभवही तत्कालीन साम्यवादी ‘सत्ते’ बद्दल प्रतिकूल मत बनविणारेच होते. कलकत्ता हे भारतातील सर्वात जुनं शहर आहे. महत्वाचं बंदर. जुनं व्यापारी केंद्र. समृद्ध अशी साहित्याची, कलेची परंपरा. सोबत बंगाली विद्वत्ता. पेरावं ते उगवावं अशी सुपीक जमीन. यांसह इतर अनेक बाबींचा विचार करता देशांतर्गत विकास प्रक्रियेत पाहिलं स्थान बंगालचं असायला हवं होतं! असा एकंदर सूर एका चर्चेतून आला. पुढे असितदा सांगतात, “इथल्या तत्कालीन सत्ताधारी कम्युनिस्टांनी संगणकाला जोरदार विरोध करून पिटाळून लावले. बेंगलोर, पुणे आयटी हब म्हणून पुढे आले. साम्यवादी राजवटीत बंगालमध्ये ‘संगणक प्रवेश’ झाला असता तर कलकत्ता हे प्रमुख आयटी हब झाले असते. कालांतराने संगणकाच्या संदर्भातील उत्पादन संबंधांची (स्व-हितदर्शक) उकल झाल्याने अनेक ‘अकॅडेमीक कॉम्रेड्स’नी आपल्या मुलांना देश-विदेशात पाठवत संगणक अभियंते बनविले! कम्युनिस्टांच्या वेडेपणाने बंगालला, देशाच्या इतर प्रगत प्रदेशांच्या तुलनेत १५-२० वर्षे मागे नेऊन ठेवलंय.” असितदांनी कलकत्या बाबत वर्तवलेली ही शक्यता नाकारता येते काय ? सुरुवातीला काही प्रमाणात केलेल्या जमिनींच्या वाटपातील काम तेही नाकारत नाहीत. पण, एकच काम किती दिवस सांगणार आहात, असा त्यांचा रास्त सवाल आहे. असितदा हे कम्युनिस्ट विचारांचे विरोधक नसून सहानुभूतीदार राहिले आहेत, हे आगोदर नमूद केलेलेच आहे !

प्रवासात अनेक आघाडींवर डाव्या राजवटीचे अपयश जाणवत होते. त्यातील शेती, उद्योग आणि लोकांच्या राहणीमानाचा दर्जा या आघाडीवरील अपयश तर डोळ्यात भरणारे असेच होते. येथील हिंसक राजकारण तर सर्वश्रुतच आहे. राजकीय आघाडीवरील वैचारिक अध:पतन सात्विक संताप आणणारे होते. येथील डाव्या आघाडीत सीपीएम, सीपीआय, एसयुसीआय, फॉरवर्ड ब्लॉक, एसआरपी व असे आणखी काही पक्ष आहेत. अशा अनेक लाल छटा असणाऱ्या डाव्यांच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी तृणमूल आणि भाजपात उडया मारल्या आहेत. यात दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील सत्ताकांक्षी नेत्यांची, कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे. “सत्तेची सुरक्षितता व मुळात सत्ताकांक्षेनेच डाव्या आघाडीत आलेल्या संधिसाधुंनीच पक्षांतर केले,” अशी स्पष्टीकरणे असली तरी, अनेक ‘कॉम्रेड्स’ तृणमूल-भाजपात गेल्याचे वास्तव नाकारता येत नाही ! गेल्या विधानसभेत काँग्रेस सोबत युती करून काँग्रेस वाढली, पण ममताबाई पडल्या नाहीत. मग, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाशी ‘अंडरस्टॅण्डिंग’ करीत निवडणुका खेळल्या. काही ठिकाणी सुडाने पेटलेल्या नेत्यांनी तृणमूलला इंगा दाखवण्यासाठी भाजपाला थेट मदत केली! कधीकाळी देश धार्मिक दंगलीत पेटला असताना बंगालला शांत ठेवणाऱ्या पक्षाची आजची भूमिका आश्चर्यकारकच!

अनेक ठिकाणी सीपीएम खिळखिळी झाल्याचे जाणवत होते. काही ठिकाणी लोक सीपीएम बद्दल सहानुभूती व्यक्त करताना दिसले. पण, येत्या लोकसभेचा ममता विरुद्ध मोदी असाच सामना रचताना दिसले. मोल-मजुरी करणाऱ्या कामगारांच्याही हातात स्मार्ट फोन आले आहेत. सुंदरबनच्या टोकापर्यंत हेच ‘स्मार्ट’ चित्र दिसले. त्यातून मोदी-ममता अशा दुरंगी लढाईलाच हातभार लागेल, असं वाटतं. महाराष्ट्रात जशी शेकाप, समाजवादी, कम्युनिस्ट यांची स्पेस सेना-भाजपा ने भरत-भरत सत्तेची मजल गाठली, तशा सदृश प्रकार होत भाजपाची वाढच होत जाण्याची शक्यता अधिक! हिंदुद्वेष्टी ममता असं चित्र उभारण्याचा भाजपाचा जुनाच प्रयत्न वेग घेताना दिसतोय. धार्मिक ध्रुवीकरण तीव्र होईल अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर येणारी लोकसभा निवडणूक ही सीपीएमसाठी अस्तित्वाची लढाई असेल! बंगालमधून कम्युनिस्ट उखडले गेल्यास, पुन्हा मूळ धरण्याची शक्यता खूपच कमी असेल! बंगाल मधील दीर्घ कम्युनिस्ट ‘सत्ता’ अपयशी ठरली हे खरेच आहे. पण, म्हणून काही देशभरातील गोर-गरीब कष्टकाऱ्यांच्या बाजूचे कायदे बनवण्यासाठी, त्यांच्या अंमलबाजावणीसाठी संसदीय कामकाजातून आणि संसदे बाहेरील आंदोलनांतून कम्युनिष्टांनी मिळवलेल्या अभूतपूर्व यशाचे महत्व कमी होत नाही, हेही तितकेच खरे. केवळ बंगालच नव्हे तर, एकूणच उत्तर भारतातील एकंदर परिस्थिती पाहिल्यानंतर, महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीचे, सहकार चळवळीचे महत्व मनात अधिकच गडद होत जाते!

प्रवासात बंगाल मागं पडत गेलं तसं साम्यवादा बद्दल नव्यानं विचारचक्र सुरु झालं. “सुलभीकरण करण्याकडे मानवी स्वभावाचा कल राहत आला आहे. त्यामुळे अनेकदा तत्वज्ञान आणि व्यवस्था (सिस्टीम) यांमध्ये फारकत न करता आपण एकाक्षीय धारणेतला भ्रम जोपासत राहतो. नरहर कुरुंदकर धर्माची, पारमार्थिक धर्म आणि व्यावहारिक धर्म अशा स्वरूपाची फोड करताना दिसतात. यापद्धतीने साम्यवादाकडेही तत्वज्ञान आणि सत्ता अशा फोड रुपात पहिले गेले पाहिजे. तशी फारकत केली गेली पाहिजे. सत्ता ही तत्त्वज्ञानाच्या तुलनेत व्यवस्थेकडे अधिक झुकलेली असते. सत्ता हळूहळू व्यवस्थाकेंद्री बनत जाते. अशावेळी तत्वज्ञान सत्तेच्या मानेवरील जू बनतं. मशीन्स तत्वज्ञान बनवत नाहीत. मशीन्स व्यवस्था बनवत नाहीत. मशीन्स सत्ताही चालवत नाहीत. हे सर्व करतात ते मनुष्य नावाचे प्राणी! त्यामुळे, या प्राण्याच्या मूलभूत प्रेरणा आणि मर्यादाही लक्षात घेतल्या पाहिजेत. साम्यवादी तत्वज्ञान श्रमिकांच्या मुक्तीची घोषणा करते. पण, साम्यवादी राजवट (व्यवस्था) तशी असेलच असे सांगता येत नाही. “सर्व प्राणी समान असतात, पण काही प्राणी अधिक समान असतात!” हे जॉर्ज ऑरवेलच्या ‘ऍनिमल फार्म’ या प्रसिद्ध कादंबरीतील वाक्य साम्यवादी तत्वज्ञानाला उद्देशून नव्हे तर तत्कालीन रशियन साम्यवादी राजवटीला (व्यवस्थेला), मनुष्याच्या दांभिक वृत्तीला उद्देशून आहे. तत्वज्ञानाचा आणि सत्तेचा (व्यवस्थेचा) वाहक मनुष्य आहे. या वाहकामधील सत्ता आणि तत्वज्ञान यातलं द्वंद्व तत्वज्ञानाकडे कल असलेल्या व्यक्तीच्या भावविश्वातील तत्वज्ञानाला अधिक कर्मठ बनवतं. (यामध्ये, मानसिक पातळीवर इतर अनेक घटकही कार्यरत असतात) तर, सत्तेकडे कल असणाऱ्याला सत्ता जाण्याची भीती, सत्तेचा मोह, त्यातून तत्वज्ञानाशी झालेली फारकत ‘गिल्ट काँन्शियस’सह सत्ता हाकायला भाग पाडते. त्यातून येणारा ‘न्यूनगंड’ सत्तेला अपयशी बनवतो. तर, अनेकदा क्रूरही! यात पहिला बळी, सत्तेपेक्षा तत्वज्ञानाला अधिक महत्व देणाऱ्या स्व-पक्षीयांचाच असतो. कम्युनिस्ट असो वा भाजप, टोकाच्या(एक्स्ट्रीम) पण वास्तवात येण्यास अवघड अशा कट्टर विचारधारेच्या बाबतीत कमी अधिक फरकाने वरील प्रमाणे घडत असल्याचे दिसून येईल. तत्वज्ञानाचे सुरुवाती पासूनच सपाटीकरण होत आलेल्या काँग्रेस सारख्या पक्षाचे असे द्वंद्व होण्याचे प्रसंगच मुळी कमी येतात. सत्ता (व्यवस्था) हेच तत्वज्ञान असले की झालेच! लोकशाहीतील दर पाच वर्षाने जनतेचा कौल घेण्याच्या बंधनाने असणारी सत्तेच्या असुरक्षिततेची सततची टांगती तलवार (सर्वंकष सत्तेचा अभाव), केंद्र-राज्य संबंध, मतांसाठी अपरिहार्य लोकानुनय, मतदारांच्या जात-धर्म-भाषा-प्रांत आधारित ध्रुवीकरणामुळे वर्ग लढ्यातील अडचणी यांसारख्या बाबी भारतीय परिप्रेक्षातील लोकशाही प्रकारातील साम्यवादाच्या अपयशाची काही महत्वाची कारणे आहेत. तर, जगभरातील हुकूमशाही साम्यवादी राजवटींमध्ये हुकूमशाहीतील अंगभूत मर्यादाच त्याच्या अपयशास कारण ठरते. कशी ते पाहूया.

कामगार वर्गाचं राज्य (कामगार वर्गाची हुकूमशाही) असं कितीही म्हटलं तरी सत्ता काही सर्व कामगार वर्ग हाकत नसतो. काही ‘अधिक समान असलेल्या प्राण्यांकडून’ सत्ता चालवली जाते. या अधिक समान प्राण्यांमध्येही काही ‘अधिक समान’ प्राणी असतात. अशा सत्ता चालवणाऱ्या ‘समान’ प्राण्यांची अधिकतेवर आधारित एक उतरंड असते. ‘सर्वात अधिक समान’ प्राणी या उतरंडीत सर्वोच्च स्थानी असतो. आता, या एकट्या ‘सर्वाधिक समान’ प्राण्याच्या निर्णयावर, अनेक वेळा तर लहरीपणावर देशाचे भवितव्य अवलंबून असते! असा ‘एखादा’ प्राणी चांगला लागला आणि तो ‘सर्वाधिक समान’ या पदावर टिकून राहिला तर देश तरून जातो. खराब लागला तर देश लयाला जातो. प्रत्त्येक प्राण्याचं त्या-त्या परिप्रेक्षात एक अनन्यत्व असतं. स्वतःच असं वैशिष्ट्य असतं. स्वतःची अशी शैली असते. एका ‘सर्वाधिक समान’ पण अनन्य प्राण्याच्या जागी दुसरा ‘सर्वाधिक समान’ पण अनन्य असा प्राणी येतो. देशाच्या ‘सर्वाधिक समान’ प्राण्यावरच देशाचं भवितव्य सातत्याने लटकलेलं राहतं. त्याशिवाय, ‘अधिक समान’ प्राण्यांच्यात ‘सर्वाधिक समान’ होण्यासाठी सतत झुंज लागलेली असते! कितीही उच्चरवाने ‘समूहा’चा धोशा लावला तरी, ‘व्यक्तीच’ निर्णायक ठरत असते. असो, शेवटी व्यक्ती, व्यक्तीचं त्या-त्या परिप्रेक्षात अनन्यत्व, व्यक्तीचं भावविश्व, व्यक्तीच्या मूलभूत प्रेरणा, व्यक्तीच्या मर्यादा, व्यक्ती-व्यक्ती अंतरसंबंध इत्यादी बाबी, थोडक्यात ‘माणूस’ समजून घेतल्यास अनेक आदर्शवादी, पोथीनिष्ठ, तारुण्यसुलभ भ्रमातून बाहेर येण्यास मदत होईल!” इति!

–By अभिषेक मिठारी

Share

2 thoughts on “‘लाल’ भ्रमाचा, ‘बंगाली’ भोपळा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *